विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून ओळखले जाईल. ‘पुणे तेथे काय उणे’ असे मोठ्या अभिमानाने म्हटले जायचे आता ‘पुणे तेथे गुन्हे’ अशी नाचक्की होईल. असे होण्यामागे बुधवारी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर सराईत गुन्हेगाराने केलेला बलात्कार कारणीभूत आहे. दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या स्मृती अद्यापही ताज्या असतानाच बुधवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीने स्वारगेट पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी कोण आहे ते स्पष्ट झाले. आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे असे असून तो ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. पीडित मुलगी पुण्यात काम करते. ती फलटणला जाणार होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास ती बसची वाट बघत होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला आणि तिच्याशी काहीतरी बोलत असल्याचे फुटेजमध्ये दिसले. त्यानंतर तिच्या शेजारचा माणूस उठून निघून गेल्याचे दिसले. आरोपीने गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला आणि ‘ताई’ कुठे जायचे आहे असे विचारले. मुलीने फलटणला जायचे आहे असे सांगितल्यानंतर ती बस इथे नाही दुस-या ठिकाणी लागते असे सांगितले.
तुला त्या बसमध्ये बसवतो असे सांगितल्याने ती मुलगी आरोपीसह बसजवळ जाताना फुटेजमध्ये दिसते. बसमध्ये अंधार होता त्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आठ पथकांमार्फत शोधमोहीम सुरू केली आहे. बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर बस स्थानक परिसरातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज यामुळे अधोरेखित झाली आहे. या घटनेतील आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा ‘शक्ती’ कायदा राज्यात त्वरित लागू करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
स्वारगेट बसस्थानकाच्या आवारात दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याच्या एकापाठोपाठ पाच ते सहा घटना घडल्या होत्या. एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांच्या पिशवीतून दागिने तसेच मोबाईल चोरीच्या घटना घडतात. एसटी स्थानकाच्या आवारातील चोरी तसेच गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त घालण्याची गरज स्वारगेट, शिवाजी नगर, पुणे स्टेशन एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. त्यासाठी स्थानकातील सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. राज्याची सांस्कृतिक नगरी, सुधारणावादी चळवळीचे केंद्र, विद्येचे माहेरघर, ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार अशा अनेक विशेषणांनी पुण्याची महती गायिली जायची पण गत दशकभरात या पुण्यनगरीने स्वत:चीच बदनामी करून घेण्याचा सपाटा लावला आहे की काय अशी शंका येते. देशाच्या दाही दिशांतून हजारो विद्यार्थी पुण्यात केवळ शिक्षणासाठी येतात. इथे असलेले गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देणारे ठरते अशी लोकांची अजूनही धारणा आहे.
आता तर तंत्रज्ञानाने अशी काही भरारी मारली आहे की सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत अभ्यासक्रम पुण्यात शिकवले जातात. पुण्यातील शिक्षण संस्थांची संख्या सुमारे पाच पटींनी वाढली आहे. औद्योगीकरण अथवा माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पुण्याने आघाडी मारली आहे. हिंजेवाडी आणि आजूबाजूचा परिसर आयटी हब म्हणून ओळखला जातो आहे. पुण्याची लोकसंख्याही दुपटीने वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येचे तितकेच चित्रविचित्र परिणाम पुण्यात पहावयास मिळत आहेत. गत काही वर्षांत गुन्हेगारीचा आलेखही वाढला आहे. त्यामुळे पुण्याला लागू होणारी सारी विशेषणे मुळा-मुठात विसर्जित झाल्याचे चित्र दिसत आहे. कोयता गँग, तलवार गँग, ड्रग्जचा वाढता प्रसार, व्यभिचार, अत्याचार आणि भ्रष्टाचारातही पुणे अव्वलस्थानी आले आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ असे मोठ्या अभिमानाने म्हटले जायचे पण आता ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे’ असे शरमेने म्हणायची वेळ आली आहे. स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये मुलीवर झालेला बलात्कार ही पुण्यातल्या गुन्हेगारीची ताजी आवृत्ती म्हणावी लागेल. आता कायद्याचा धाक राहिलेला नाही असे खेदाने म्हणावे लागते. गुन्हेगारीला मिळणारे अभयच त्याला कारणीभूत आहे. गत वर्षभरात महिलांवरील अत्याचारांबाबत महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.
बदलापूरमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात जनतेचे उत्स्फूर्त आंदोलन, आरोपीबरोबर झालेल्या ख-या-खोट्या चकमकीतील त्याचा मृत्यू आदी घटना अजूनही ताज्या आहेत. त्यातील जनभावना दुर्लक्षित करता येत नाही. सरकारी स्तरावर जे काही कठोर कायदे अपेक्षित आहेत ते व्हायचे तेव्हा होतील परंतु समाजात असलेली या संदर्भातील चीड अधिक महत्त्वाची ठरते. महिला अत्याचाराविरोधात आंध्र प्रदेशमध्ये ‘दिशा’ विधेयक आणले गेले परंतु त्याला अजून कायद्याचे स्वरूप प्राप्त झालेले नाही. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर पुढील वीस दिवसांत आरोपीला शिक्षा ठोठावण्याची तरतूद त्यात आहे. तसा कायदा महाराष्ट्रातही आणण्याची घोषणा झाली परंतु अजूनही त्या कायद्याचा विचार झालेला दिसत नाही. म्हणजेच महिलांवरील अत्याचाराला तातडीने आळा बसावा अशी इच्छाशक्तीच राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही. महिला सुरक्षिततेसाठी वेगवेगळे कायदे आहेत परंतु त्यांची भीतीच राहिलेली नाही. गुन्हेगारी किंवा विकृतीच्या प्रवृत्तींनी पुण्याला विळखा घातला आहे हेच स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणावरून दिसून येते.