पुणे : प्रतिनिधी
पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महिला व लहान मुलांना अपहरण करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे पुणे पोलिसांनी नवीन प्लॅन केला आहे. पुण्यातून बेपत्ता झालेल्या मुलांच्या तसेच महिलांच्या शोधासाठी पुणे पोलिस ‘ऑपरेशन मुस्कान -१३’ ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. १ ते ३० डिसेंबर या कालावधीत ही मोहिम राबविली जाणार असून, मोहिमेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांत पथकाची स्थापना करण्यात येणार आहे.
‘ऑपरेशन मुस्कान – १३ ’ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि १८ वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणार आहे. एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहिम राबवली जाते. शहरातील सर्व पोलीस अधिका-यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातून बेपत्ता झालेली लहान मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतात. मात्र, दरवर्षी एक महिना यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यानुसार यंदाही ही मोहिम राबविली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
पथकाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिका-याशी समन्वय साधण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन पोलीस कर्मच-यांचा या पथकात समावेश राहणार आहे. मोहिमेतंर्गत पुणे शहर तसेच परिसरातून बेपत्ता झालेली मुले आणि महिला व तरुणींचा शोध घेण्यात येणार आहे.