पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी शहर आणि जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत एकूण ३०३ उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. तर शहर आणि जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांत बंडखोरी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून चार तर महायुतीच्या वतीने पाच मतदारसंघांत हे चित्र आहे. एकूण २१ जागांसाठी ४८२ उमेदवार उभे होते. त्यातील १७९ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ३०३ उमेदवार राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. बहुतांशी मतदारसंघांत महायुती, महाविकास आघाडी, मनसे आणि अपक्ष उमेदवार यांच्यात चुरशीच्या लढती होणार आहेत. शहरात तीन मतदारसंघांत शिवाजीनगर,पर्वती आणि कसबा मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे.कसबा,पर्वतीआणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघांत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात त्याच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे न घेता कायम ठेवले आहेत.
मावळ,भोर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, चिंचवड या मतदारसंघांत हीच स्थिती आहे तर काही मतदारसंघांत थेट लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात बारामती मतदारसंघ, इंदापूर मतदारसंघ, पुणे कँटोन्मेंट मतदारसंघ यांचा समावेश आहे तर काही मतदारसंघांत तिरंगी लढत होत आहेत.