पुणे : पुण्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. धंगेकर हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत. मात्र लवकरच ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे रवींद्र धंगेकर हे लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे पुण्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रवींद्र धंगेकर आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांनी भगव्या उपरण्यासह फोटो टाकल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. धंगेकरांच्या या स्टेटसची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे.
एका वाहिनीशी संवाद साधताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या पक्षांतराबाबत मत मांडले आहे. धंगेकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी शिवजयंती होती. यानिमित्ताने मी सर्व शिवभक्तांसाठी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते.
मी मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो. एखाद्या सर्वसामान्याने केलेले फोटो किंवा रीलही मी स्टेटसला ठेवतो. माझा तो फोटो खूप चांगला आला होता. मला तो आवडला. त्यामुळे मी टाकला. प्रसारमाध्यमांनी त्यावर चर्चा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जुने शिवजयंतीचे फोटो टाकायला लागले.
यानंतर मग मी शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या. हा रील टाकायचा माझ्या डोक्यातला विषय नाही. ब-याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला त्यामुळे टाकला, असे मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडले आहे.
अजितदादा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आपला जन्म भगव्या उपरण्यातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटते. ऑफर देण्यात काहीही चूक नाही. मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करेल, असे सूचक विधान माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले आहे. यामुळे पुण्यामध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.