पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांमध्ये दूध दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसली आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली असून आईस्क्रीमसह इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे गायीचे दूध आणि म्हशीच्या दुधाच्या दारामध्ये वाढ करण्यात आली आहे. दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. तसेच, १५ मार्चपासून लागू करण्यात आल्याचे दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.
गायीच्या दुधाची विक्री किंमत ५६ रुपयांहून ५८ रुपये होणार आहे. तर, म्हशीच्या दुधाची विक्री किंमत ही ७२ रुपयांहून ७४ रुपये होणार आहे. पुण्यातील कात्रज दूध संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. बैठकीत दूध भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. भेसळ आणि शेतक-यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेत चितळे दूध पेढीचे संचालक श्रीपाद चितळे, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आणि कात्रज दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे उपस्थित होते.
राज्यामध्ये दुधाचे संकलन आता सकाळ आणि संध्याकाळ असे दोनवेळा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण दुधाची उपलब्धता ग्राहकांना करणे शक्य होणार असल्याची माहिती कात्रज दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांनी दिली. तसेच, राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेमध्ये गेल्या ३ ते ४ महिन्यांचे लिटरला ५ रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. ते अनुदान लवकर मिळावे, अशी मागणीही बैठकीत केल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरला मागणी वाढली आहे. देशांतर्गत बाजारातही मागणी वाढल्यामुळे पावडर आणि बटरच्या दरवाढीला चालना मिळाल्याची माहिती रणजितसिंह देशमुख यांनी दिली.