34.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रपुरंदर विमानतळाला शेतक-यांचा विरोध

पुरंदर विमानतळाला शेतक-यांचा विरोध

पुणे : प्रतिनिधी
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक शेतक-यांचा विरोध अधिक तीव्र झाला आहे. आमरण उपोषणानंतर, सोमवारी संतप्त शेतक-यांनी ४० अंश सेल्सियस तापमानात आणि रखरखत्या उन्हात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला. ‘विमानतळ आमच्या प्रेतांवरूनच होईल,’ असा निर्वाणीचा इशारा देत, जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका शेतक-यांनी घेतली.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमीन या विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे. याला विरोध करण्यासाठी या गावांमधील हजारो शेतकरी, महिला आणि लहान मुले सोमवारी अल्पबचत भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मोर्चात सहभागी झाले होते.

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘विमानतळ होऊ देणार नाहीच’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाले. यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुंभारवळणच्या सरपंच मंजुषा गायकवाड म्हणाल्या, हा तालुका नष्ट करण्याचे कटकारस्थान असून, आमचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

भूसंपादनाला विरोध, प्रशासनाला निवेदन
शेतक-यांनी भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसल्याचा आरोप केला. आम्हाला आमची जमीन द्यायची नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींना अधिकार आहेत आणि सातही गावांनी विमानतळाला विरोधाचे ठराव केले आहेत, तरीही सरकार ते विचारात घेत नाही, हा अन्याय असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनीही शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR