16.8 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिसांचे कौतुक, एन्काऊंटर करून चांगलेच केले : शर्मिला ठाकरे

पोलिसांचे कौतुक, एन्काऊंटर करून चांगलेच केले : शर्मिला ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी
राज्याला हादरवून टाकणा-या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या एन्काऊंटरचे समर्थन केले आहे.

दरम्यान, अक्षय शिंदे चकमक प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या सुनावणीत न्यायालाने पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे चकमक प्रकरणात जखमी पोलिस निलेश मोरे यांची भेट घेतली. यानंतर मीडियाशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मला एक मेसेज आला आहे. तो वाचून दाखवते. एन्काऊंटर केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन. जाणूनबुजून एन्काऊंटर केले असेल, तर पोलिसांचे डबल अभिनंदन. ते एन्काऊंटर कसेही असले, तरी महिलांवर अत्याचार एवढे वाढले आहेत की, जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा गोष्टींवर वचक बसणार नाही. असे एन्काऊंटर वरचेवर झाले पाहिजेत, असे माझे मत आहे, असे शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

पोलिसांचे खास अभिनंदन
पोलिसांचे खास अभिनंदन करण्यासाठी आले आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची व्यक्ती किंवा राज ठाकरे यांची पत्नी म्हणून बोलत नाही. मी एक महिला म्हणून बोलत आहे. मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते आहे. आमच्यात इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दररोज अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अत्याचार, खून वाढले आहेत. त्यामुळे महिलांची प्रतिनिधी म्हणून बोलते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR