दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील एनटीपीसी या वीज निर्मिती कंपनीमध्ये कामाला घेत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने वैतागून आपल्या भावाच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनीमुळे आत्महत्या केल्याचा आरोप करीत संतप्त कुटुंबाने अधिकारी, कंत्राटदार आणि दलालावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मृतदेह एनटीपीसी प्रकल्पासमोर ठेवून तब्बल अकरा तास आंदोलन केले.
मिथुन घनू राठोड (वय ४२, रा. फताटेवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवक शेतकऱ्याचे नाव आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे २००९ साली औष्णिक वीज प्रकल्प सुरू झाला. यासाठी परिसरातील हजारो एकर शेती संपादित केली गेली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल असे तेव्हा सांगितले गेले होते, असे बोलले जाते. २००९ साली मिथुन राठोड यांची दहा एकर शेतजमीन एनटीपीसी प्रकल्पात गेली होती. तेव्हापासून येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी मिथुन राठोड हे आपला भाऊ अशोक राठोड यांच्या शेतात काम करीत होते. गेल्या सहा महिन्यांपासून एनटीपीसी प्रकल्पात नोकरी मिळावी म्हणून एनटीपीसी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून व निवेदन देऊनसुद्धा मिथुन यांना कंपनी कामाला घेत नसल्यामुळे ते तणावात होते. अखेर अधिकारी नोकरी देत नसल्याने कंटाळून त्यांनी आपल्या भावाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन पहाटे साडेसहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मिथुन यांनी आत्महत्या केल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडून आक्रोश केला. मिथुन यांच्या पश्चात पत्नी शोभा आणि आयुष्य हा अडीच वर्षाचा मुलगा आहे.
मिथुन यांचा मृतदेह एनटीपीसी प्रकल्पाच्या गेटसमोर ठेवून आंदोलन करण्यास सुरुवात केली. अधिकारी, कंत्राटदार आणि दलाल यांच्यामुळे मिथुन यांनी आत्महत्या केली असा कुटुंबीयांनी आरोप करुन असून या सर्वांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, यावेळी संतप्त जमावाने दगडफेक केली.
खासदार प्रणिती शिंदे आणि प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी एनटीपीसी प्रकल्पासमोर घटनास्थळी भेट देऊन मिथुन राठोड परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी या संदर्भात बैठक घेऊन राठोड परिवाराला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तेथून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला.