शाह यांचे गौरवोद्गार, २० लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरीपत्र वाटप
पुणे : प्रतिनिधी
देशातील प्रत्येकाला घर, वीज, धान्य देणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना आहे. शौचालय देऊन गरिबांचा स्वाभिमान मोदींनी जपला. कोणत्याही देशाच्या प्रमुखांनी फक्त १० वर्षांत ६० लाख लोकांना घर आणि धान्य देण्याचे काम केले नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. महायुती सरकारनेही चांगले काम केले असून, अटल सेतू हा एक महत्त्वाचा चमत्कारच आहे, असेही ते म्हणाले.
दोन दिवसीय पुणे दौ-यात आज बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुस-या टप्प्यातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरीपत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी शाह बोलत होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले. अनेकदा असे होते की अनेक सरकार सत्तेत येतात आणि घोषणा करतात. त्यानंतर किती तरी वर्ष घोषणा पूर्ण करण्यासाठी लागतात. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २० लाख कुटुंबाला घरे देण्याचे काम केले. आज २० लाख कुटुंबाला स्वत:चे आणि हक्काचे घर मिळाले, असे अमित शाह म्हणाले.
खरी शिवसेना, खरी
राष्ट्रवादी दाखवून दिली
मी महाराष्ट्रातील जनतेचे खूप आभार मानतो. कारण महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला निवडणुकीत आशीर्वाद दिला. यासोबतच महाराष्ट्रातील जनतेने खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे निवडणुकीत दाखवले, अशी टीका करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.