बंगळुरु : वृत्तसंस्था
आरसीबीच्या संघावर घरच्या मैदानात पराभवाची नामुष्की ओढवली. आरसीबीच्या संघाने टीम डेव्हिडच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर ९५ धावांपर्यंत मजल मारली होती. पंजाबच्या संघाने या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार कामगिरी केली आणि पाच विकेट्स राखून सामना जिंकला.
पंजाबचा संघ आरसीबीच्या ९६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांनाही एकामागून एक धक्के बसायला लागले. युवा सलामीवीर प्रियांश आर्या यावेळी १६ धावांवर बाद झाला तर कर्णधार श्रेयस अय्यरला सहा धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाबची अवस्था ही ८ षटकांनंतर ४ बाद ६३ अशी झाली होती. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत आला होता. पण त्यानंतर नेहाल वधेरा आणि शशांक सिंग यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजयाची आशा दाखवली. पंजाबला विजय मिळाला आणि त्यांनी दोन गुण कमावले. या विजयासह त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले.
आरसीबीने चौकारापासून सुरुवात केली खरी, पण त्यांना त्यानंतर एकामागून एक धक्के बसत गेले. सलामीवीर फिल सॉल्ट ४ धावांवर बाद झाला. विराट कोहली या सामन्यात फॉर्मात येतो का, हे चाहते पाहत होते. पण विराट कोहलीने यावेळी चाहत्यांना निराश केले. तो अर्शदीपच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्यासाठी गेला खरा, पण त्याचे टायमिंग चुकले. त्यामुळे चेंडू वर उडाला आणि मार्को येन्सनने त्याचा अप्रितम झेल पकडला. आरसीबीचे फलंदाज एकामागोमाग बाद होत राहिले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे त्यांना ९५ धावांपर्यंतच मजल मारता आली. परंतु हे माफक आव्हान पार करताना पंजाबलाही मोठी कसरत करावी लागली.