नागपूर : शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहारचे माजी आ. बच्चू कडू यांनी बुधवारी अनोखे आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ परिसरातील ट्राफिक पार्क जवळ रक्तदान शिबिर आयोजित करीत आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान आंदोलन करून शेतक-यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर संभाजी महाराज यांनी एकेक रक्ताचा थेंब सांडून स्वराज्य निर्माण करण्याचा आणि रक्षण करण्याचे काम केले. आम्ही शेतकरी आणि दिव्यांगांचा रक्षण करण्यासाठी रक्तदान केले. सातबारा कोरा करणार, असे म्हणणा-या फडणवीस साहेबांना अन्नदाता आणि दिव्यांगांसाठी केलेल्या रक्तदानातून संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. रक्त सांडवण्यापेक्षा रक्तदान करून केलेल्या आंदोलनाची दखल घेतली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.
कर्जमाफीवर मुख्यमंत्री बोलत नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहेत. ते खरे रामभक्त असतील तर उद्याचं रक्त सांडवण्याचा आंदोलन न होता या रक्तदानातून त्यांनी आम्हाला संदेश द्यावा, या सगळ्या मागणीच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून ते कर्जमाफीवर बोलतच नाही, त्यांनी बोलते व्हावे यासाठी हे आंदोलन केल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
कसे आहे आंदोलन?
रायगड आंदोलन झाले, नंतर मशाल आंदोलन झाले. आज रक्तदान आंदोलन केलं. आता आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर २ जूनला चार ते पाच हजार लोक एकत्र होऊन तिथे बजेटचा संक्षिप्त उतारा अजितदादांसमोर मांडणार आहोत. यानंतर ३ तारखेला पंकजा मुंडेंच्या गावात जाणार, नंतर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री त्यांच्या गावात कर्जमाफी विषयी आम्ही बोलणार आहोत. ६ जून रोजी पुन्हा नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर चटणी-भाकर घेऊन थांबणार आहोत. यानंतरही कर्जमाफीचा निर्णय झाला नाही तर तुकडोजी महाराजांच्या मोझरी या गावी ७ जूनपासून आपण स्वत: या सर्व मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.