बदलापूर : प्रतिनिधी
बदलापूरकरांनी मोठा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता बदलापूरच्या सर्व शाळांमधून शिवी हद्दपार होणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले वळण लागावे, वाद टळावेत यासाठी बदलापूरमधील सर्व शाळांमधून शिवी हद्दपार करण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने शिवी दिल्यास त्याचा दंड पालकांना भरावा लागणार आहे.
हल्ली शाळेत विद्यार्थ्यांच्या तोंडून सर्रासपणे शिव्या ऐकायला मिळतात. पण त्यांच्या तोंडातली ही शिवराळ भाषा काढून टाकण्यासाठी बदलापुरात ‘शिवीमुक्त शाळा’ हे अनोखे अभियान राबविण्यात येत आहे. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.
बदलापूरच्या आदर्श शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यशाळेतून या अभियानाला सुरुवात झाली. अलीकडच्या काळात टीव्ही आणि मोबाईलचा वाढता प्रभाव, मुलांकडे पालकांचे होत असलेले दुर्लक्ष, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिव्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलं असभ्य वर्तन करू लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी बदलापुरातल्या सर्व शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवले जाणार आहे. यासाठी या सर्व शाळांमध्ये कडक नियमावली केली जाणार असून, मुलांच्या वर्तनावर शिक्षकांची नजर असणार आहे. मुलांनी शिवीगाळ केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि हा दंड पालकांना भरावा लागेल.