लंडन : वृत्तसंस्था
मृत्यूनंतर आपला मृतदेह दीर्घकाळापर्यंत सुरक्षित ठेवला जावा, यासाठी लोक अक्षरश: लाखो रुपये खर्च करून शवागृहात जागा बूक करत आहेत. या संपूर्ण योजनेला क्रायोनिक्स स्किम असे नाव देण्यात आले आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण अनेकांनी जिवंत असतानाच यासाठी बुकिंग केले आहे.
लंडनमध्ये नुकताच एका ५० वर्षीय महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाला. आपला मृतदेह क्रायोनिक्स स्किमअंतर्गत सुरक्षित ठेवला जावा अशी तिची इच्छा होती. जेणेकरून एक दिवस पुन्हा जिवंत होता येईल. या व्यक्तीच्या इच्छेनुसार, क्रायोनिक्स इंस्टिट्यूटचे एक्सपर्ट आले आणि संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तिला बर्फात पॅक केले. बॉडी परफ्यूज करण्यात आली आणि शरिरातील रक्त आणि पाण्यावर प्रक्रिया करून त्यांचे रुपांतर क्रायो प्रोटेक्शन मिश्रणात करण्यात आले.
मृतदेह बर्फात असूनही गोठत नाही आणि एखाद्या जिवंत माणसाप्रमाणे सुरक्षित राहतो. यानंतर तो विमानतळावर नेण्यात आला आणि तेथून क्रायोनिक्स संस्थेच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
आतापर्यंत २५० हून अधिक लोकांनी आपले मृतदेह येथे ठेवण्यासाठी बुकिंग केले आहे. यांपैकी बहुतेक अमेरिकन आहेत. यानंतर अनेक जण ब्रिटनमधील आहेत. ५० हून अधिक लोक प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी आपल्या पाळीव प्राण्यांसाठीही बुकिंग केले आहे.