सांगली : प्रतिनिधी
सांगलीच्या म्हैसाळ येथे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रॅक्टरचा अपघात झाला. अपघातानंतर कर्नाटक बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात उलटली. या अपघातामध्ये बसमधील २० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जाण्यासाठी मार्गस्थ झाली. सकाळी दहाच्या सुमारास बस मार्गस्थ झाल्यानंतर साडेदहाला सदरचा अपघात झाला. यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारे मोकळे ट्रॅक्टर दोन ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होते. कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणा-या ट्रेलरला धडक दिली. त्यानंतर बसचालकाचा बसवरील ताबा सुटला.
बसवरील नियंत्रण सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे ३० फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली. अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या बसमधून जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात बसमधील वीस प्रवासी जखमी झाले असून जखमींमधील दोन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १८ प्रवाशांना मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.