15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
HomeUncategorizedबांगलादेश लष्कराच्या नियंत्रणाखाली; शेख हसिनांचा राजीनामा, भारतात दाखल

बांगलादेश लष्कराच्या नियंत्रणाखाली; शेख हसिनांचा राजीनामा, भारतात दाखल

 

– १४ पोलिसांचा मृत्यू
– ३०० पोलिस जखमी
– ११ हजार अटकेत
– देशभर बेमुदत संचारबंदी
– इंटरनेट, सोशल मिडीया बंद

ढाका : वृत्तसंस्था
नोकरीमधील आरक्षण संपवण्याच्या मागणीसाठी सुरु असलेले बांगलादेशातील आंदोलन अती उग्र बनलं आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती, अखेरीस त्यांनी आज (सोमवार) राजीनामा दिला. त्यांच्याविरोधात सुरु असलेलं हिंसक आंदोलन पाहता त्यांनी देश सोडला असून त्या विशेष हेलिकॉप्टरने भारतात दाखल झाल्या आहेत. आंदोलक आणि सत्तारुढ पार्टीच्या समर्थकांमधील हिंसाचारात रविवारी १४ पोलिसांसह १०० जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. शेकडो जखमी झाले आहेत. परिस्थिती इतकी खराब आहे की, देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावावा लागला आहे. इंटरनेट बंद करण्यात आले.

भारत सरकारने देखील भारतीय नागरिकांना बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिलाय. सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या आपत्कालीन फोन नंबरद्वारे संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय सरकारने यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

रविवारी या आंदोलनाने उग्र रुप घेतले. आंदोलक म्हणतात, आता आमची एकच मागणी, पीएम शेख हसीना यांचा राजीनामा. बांग्लादेशातील प्रमुख वर्तमानपत्र ‘प्रोथोम अलो’ने आपल्या बातमीत म्हटले की, देशभरात हिंसक चकमकी, गोळीबार, जाळपोळ आणि प्रत्युत्तराच्या कारवाईत आतापर्यंत १०० लोक मारले गेले.

पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात १४ पोलिसांचा मृत्यू झाला. यात सिराजगंज इनायतपुर या एकाच पोलीस ठाण्यातील १३ पोलिसांची हत्या करण्यात आली. ३०० पोलीस जखमी आहेत.

बांग्लादेशात या मुद्यावरुन अनेकदा हिंसाचार झाला आहे. १९७१ च्या स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकरीमधील ३० टक्के आरक्षण समाप्त करावे, ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे. आधी हिंसाचार भडकलेला, तेव्हा कोर्टाने कोट्याची मर्यादा कमी केलेली. आता आंदोलक शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.आतापर्यंत ११,००० पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. आंदोलकांनी पोलीस स्टेशन, सत्तारुढ पक्षाचे कार्यालय आणि त्यांच्या नेत्यांच्या घरावर हल्ले केले आहेत. अनेक वाहने जाळली. सरकारने मेटा प्लेटफॉर्म फेसबुक, मॅसेंजर, व्हाट्सएप आणि इंस्टाग्राम बंद करण्याचे आदेश दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR