ढाका : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सुरूच आहेत. यामुळे येथील हिंदूंच्या समस्या वाढतच आहेत. आता देशातील हिंदूंना राजीनामे देण्यास भाग पाडले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर हिंसाचारग्रस्त देशात अल्पसंख्याक समुदायातील किमान ४९ शिक्षकांचे जबरदस्तीने राजीनामे घेण्यात आले, अशी माहिती अल्पसंख्याकांच्या एका संघटनेने दिली.
बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन ओक्य परिषदेची विद्यार्थी शाखा बांगलादेश छात्र ओक्य परिषदने शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.संघटनेचे समन्वयक साजिब सरकार म्हणाले की, ७६ वर्षीय पंतप्रधान हसीना यांनी पायउतार झाल्यानंतर आणि देश सोडल्यानंतर अनेक दिवस सुरू असलेल्या हिंसाचारामुळे देशभरात अल्पसंख्याक शिक्षकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आणि त्यापैकी किमान ४९ जणांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, त्यातील १९ जणांना नंतर पुन्हा कामावर घेण्यात आले. धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांनाही या काळात हल्ले, लूटमार, महिलांवरील हल्ले, मंदिरांची तोडफोड, घरे आणि व्यवसायांची जाळपोळ अशा घटनांचा सामना करावा लागत आहे.