ढाक्का : वृत्तसंस्था
बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अवामी लीगच्या आज ६ फेब्रुवारीला होणा-या देशव्यापी विरोध प्रदर्शनाच्याआधी राजधानी ढाकासह बांग्लादेशच्या अनेक शहरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. आंदोलकांनी ढाकाच्या धानमंडी भागातील शेख मुजीबुर्रहमान यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोर बुलडोझर घेऊन आले होते. त्यांनी शेख मुजीबुर्रहमान यांचे घर पेटवून दिले. हजारोंच्या संख्येने अवामी लीगचे समर्थक, कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक झाली आहे. या घटनेमुळे शेख मुजीबुर्रहमान यांच्या कन्या शेख हसिना या व्यथित झाला आहेत.
अवामी लीगने गुरुवारी बांग्लादेशात ट्रांसपोर्ट सिस्टम बंद करुन हायवेसह अनेक शहरात जाम करण्याची तयारी केली होती. अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात अवामी लीगने आज ६ रोजी मोठ्या प्रदर्शनाचे आवाहन केले होते. समाजकंटक गेट तोडून जबरदस्तीने शेख मुजीबुर्रहमान यांच्या घराच्या आत घुसले. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या ऑनलाइन भाषणावरुन हे विरोध प्रदर्शन सुरु झाले.
शेख हसीना यांच्या भाषणाविरोधात आंदोलकांनी धानमंडी ३२ येथे बुलडोजर मार्च काढण्याची घोषणा केली. त्यांनी सुरुवातीला रात्री ९ वाजता घरावर बुलडोझर चालवण्याची धमकी दिली होती. पण आंदोलकांनी आपली योजना बदलली व ८ वाजताच बुलडोझर घेऊन पोहोचले. या आंदोलनाला त्यांनी एका रॅलीचे स्वरुप दिले होते. मोठा जमाव होता. मेन गेट तोडून आत प्रवेश केला व मोठ्या प्रमाणात बुलडोझरने इमारतीची आणि हल्लेखोरांनी घरातील साहित्याची तोडफोड केली.