लातूर : प्रतिनिधी
तीन दिवस घरोघरी सोनपावलांनी येणा-या गौराईच्या स्वागतातसाठी गेल्या काही दिवसांपासून लगबग सुरु होती. सोमवारी गौराईचे घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले. गौराईच्या नैवेद्यापासून ते जेवणापर्यंची सर्व तयारी केली गेली. गौराईच्या खानपानासाठी घरोघरी खमंग फराळाचा सुगंध दरवळतो आहे. बाजारपेठेतही फराळाची रेलचेल आहे.
गौराईला भाजीभाकरीसह आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यासाठी लाडू, करंज्या, अनारसे, चकली, चिवडा, शंकरपाळे, असा दिवाळीप्रमाणे फराळाचा बेत तयार केला आहे. गौराईचे घरोघरी आगमन होताच लाडक्या गणरायाप्रमाणेच गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली. तीन दिवस माहेरी येणा-या गौराईच्या माहेरपणात त्यांना पहिल्या दिवशी भाजीभाकरी, दुस-या दिवशी पुरणमोळीचा नैवैद्य दाखवला जातो. तिस-या दिवशी पारंपारिक पद्धतीने निरोप दिला जातो. काहींच्या घरी उभ्या गौरी असतात, काहींच्या घरी केवळ गौरीचे मुखवटे तर काहींच्या घरी तांब्यातील गौरीची पुजा केली जाते. गौरी कोणत्याही स्वरुपात असल्या तरी त्यांचे स्वागत, सजावट, गोडधोड तितक्याच भक्ती भावाने केले जाते.