बारामती : प्रतिनिधी
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. अर्धा तास झाल्यानंतरही त्यांनी आत सोडले नाही असा दावा सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. प्रतिभा पवार यांच्यासह त्यांच्या नात रेवती सुळेही होत्या. आपण खरेदी करण्यासाठी आत जात असल्याचे प्रतिभा पवारांचे म्हणणे आहे.
व्हीडीओत सुरक्षारक्षक आपल्याला आतून टाळे लावल्याचा फोन आल्याचे सांगत असल्याचे ऐकू येत आहे. कोणाचा फोन आला असे विचारले असता, त्यांनी सचिन वाघ असे उत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत.
यावेळी त्यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळेदेखील सोबत देत आहेत. आज या दोघी बारामती टेक्सटाईलमध्ये पोहोचल्या होत्या. मात्र यावेळी गेटला टाळे लावण्यात आले होते. हा संपूर्ण व्हीडीओ कॅमे-यात कैद करण्यात आला असून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा आहेत.