बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावरील रुई लीमटेक या मार्गावर कारचे टायर फुटल्याने अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात इंदापूरचे काँग्रेस नेते आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आदित्य निंबाळकर याचा मृत्यू झाला आहे. आदित्य हा केवळ २२ वर्षांचा होता. या अपघातामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा काटेवाडीहून रुई मार्गे बारामतीकडे निघाला होता. मंगळवारी (१५ जुलै) संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटी याठिकणी त्याच्या चारचाकी गाडीचे टायर फुटले आणि महामार्गावर गाडी पलटी झाली. महामार्गावरून गाडी घसरून एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात आदित्य निंबाळकर गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आदित्यला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.