24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत नणंद-भावजय यांच्यात लढत

बारामतीत नणंद-भावजय यांच्यात लढत

मुंबई : बारामतीची लढत आता पवार विरुद्ध पवार अशीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. महाविकास आघाडीकडून येथे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात आहेत. काका-पुतण्याच्या वर्चस्वाची ही लढाई असून कोण कोणावर भारी पडणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूकीत नेहमीच हा मतदारसंघ एकतर्फी राहिला आहे. त्यामुळे देशाच्या दृष्टीने बारामतीची लढाई कधी महत्त्वाची बनलीच नाही. बारामती जिंकायचीच असा चंग गेल्या काही वर्षात भाजपने बांधला होता. २०१४ साली त्यांनी महादेव जानकर यांना पुढे करत ताकद देत पवारांना जेरीस आणले. त्यावेळी जानकर यांचा निसटता पराभव झाला. त्यावेळच्या मोदी लाटेत जानकर यांनी कमळ हाती घेतले असते तर चित्र वेगळे दिसले असते, असे बोलले गेले. त्यानंतर २०१९ साली भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली. रसद पुरवली. परंतु पवारांच्या बलाढ्य किल्ल्याला त्या भगदाड पाडू शकल्या नाहीत.

बारामती जिंकायची असेल तर पवार कुटुंबातच फूट पाडली पाहिजे हे हेरून भाजपने अजित पवार यांना आपल्याकडे वळवले. आता येथील निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात ती शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होत आहे. एकीकडे अजित पवार यांचे मतदारसंघातील भक्कम नेटवर्क तर दुसरीकडे शरद पवार यांचे राजकीय डावपेच या निवडणूकीत काय घडवतील, हे येणारा काळच ठरवेल.

महायुतीसाठी हा मतदारसंघ विधानसभा क्षेत्रातील आमदारांमुळे सोपा वाटत आहे. परंतु मुरब्बी शरद पवार एवढ्या सहजासहजी कोणतीही गोष्ट होवू देत नसतात. हार ही तर त्यांच्यासाठी फार दूरची बाब आहे. १९६७ पासून बारामतीच्या मैदानावर पवार कुटुंबिय कधी हरलेले नाहीत. खुद्द शरद पवार यांनी एकाही निवडणूकीत पराभव पाहिलेला नाही. राजकीय मुत्सदेगिरी, डावपेचात ते तरबेज आहेत. त्यामुळे ते कोणता डाव टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.

मतदारसंघनिहाय ताकद
मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेतला तर बारामतीत खुद्द अजित पवार आमदार आहेत. इंदापूरला त्यांच्याच पक्षाचे दत्तात्रय भरणे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील त्यांच्यासोबत आहेत. दौंडला आमदार राहूल कुल अजित पवार यांच्यासोबत आहेत. पुरंदरचे आमदार कॉंग्रेसचे संजय जगताप व भोर वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे हे सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आहेत तर खडकवासल्यात भाजपचे आमदार भीमराव तापकीर आमदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR