बारामती : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पक्ष समोर आला आहे. सुरुवातीला पिछाडीवर असणारे अनेक नेते आता विजयी झाल्याचे चित्र आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाची. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबामध्ये लढत झाली. मात्र निकालामध्ये अजित पवार यांनी आपला गड राखला असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणूकीमध्ये देखील बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये लढत होती. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचेच पुतण्या युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांनी उमेदवारी दिली होती.
सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यामध्ये युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मागील अनेक वर्षांपासून अजित पवार यांनी बारामतीमध्ये आपला विजय कायम ठेवला आहे. यंदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये देखील अजित पवार यांना आपला विजय कायम ठेवण्यास यश आले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना ७४ हजार २५ मतं मिळाली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना ३४ हजार ७७३ मतं मिळाली आहे. अजित पवार यांनी तब्बल ३८ हजार २५२ मतांनी आघाडी मिळवली आहे. अजित पवार यांचा हा विक्रमी आकडा पाहून त्यांच्या समर्थकांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे. बारामतीमध्ये निकालाच्या पूर्वी विजायचे पोस्टर झळकले होते. आता अजित पवार यांनी बारामतीचा गड राखत आपला विजय निश्चित केला आहे.