मुंबई : प्रतिनिधी
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थातच बार्टी ही संस्था दलित समाजाला शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे. मात्र, अलिकडे मूळ हेतूलाच बाधा निर्माण करणा-या गोष्टी घडत आहेत. बार्टीने वर्षभरापूर्वी बँकिंग परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निविदा मागविल्या. मात्र, यात पुरेशा निविदा न आल्याने ४ वेळा फेरनिविदा काढण्यात आल्या. मात्र, १ सप्टेंबर आणि २७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या निविदा प्रक्रियेत बार्टी प्रशासनाने अटी-शर्थी बेमालूमपणे बदलवल्या. त्यामुळे बार्टीचा व्यवहार संशयाच्या भोव-यात अडकला आहे.
गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या अर्थकारणात काही विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी वाढत चालली आहे. संस्थेतील कामे आणि कंत्राटांवर याच व्यक्तींचा प्रभाव राहात असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. यातून संस्थेच्या मूळ हेतूला बाधा पोहोचत आहे. दरम्यान, बार्टीने वर्षभरापूर्वी बँकिंग परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेत पुरेशा निविदा न आल्याने तब्बल चारदा यासाठी फेरनिविदा काढण्यात आल्या. मात्र, १ सप्टेंबर आणि २७ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील अटी-शर्थी बेमालूमपणे बदलवल्या.
या अटी-शर्थी बदलवताना १३ ऑक्टोबर २०२२ ला काढलेल्या पहिल्या निविदेतील अटी-शर्थी तिस-या आणि चौथ्या फेरनिविदेत बदलण्यात आल्या. पहिल्या निविदेनुसार अपात्र ठरत असलेल्या कंत्राटदारांना पात्र करण्यासाठीच अटी-शर्थीत बदलांचा घाट घातल्याचा आरोप बार्टी प्रशासनावर होत आहे. यासंदर्भात बार्टी प्रशासन चुप्पी साधून असल्याने या निविदाप्रक्रियेत निर्माण झालेला संशय बळावला आहे.
नियम धाब्यावर
निविदेतील ८ अटी आणि शर्थींपैकी ६ व्या क्रमांकाची अट महत्वाची होती. कारण या अटीनुसार बार्टीच्या आधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात किमान १५ टक्के सक्सेस रेट आवश्यक होता. या अटीचा प्रस्थापित संस्थांना फटका बसणार होता. त्यामुळे नंतर मिनिमम सक्सेस रेट थेट १० टक्क्यांवर आणला गेला. तसेच १० टक्क्यांच्या खालील संस्थेचा अर्ज ग्रा धरला जाणार नाही, हे वाक्य निविदेतून वगळले. त्यानंतर चौथ्या निविदेत मागच्या अटी जैसे थे ठेवल्या.
बार्टीच्या निविदा प्रक्रियेत थेट अटी-शर्थी बदलल्या?
अपात्र कंत्राटदारांच्या सोयीसाठी फेरबदल!