पुणे : प्रतिनिधी
बाहेरून पिझ्झा मागवून खाल्ल्याने काही विद्यार्थिनी या अडचणीत सापडल्या आहेत. बाहेरून पिझ्झा मागवल्याने समाजकल्याण वसतिगृहातून विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. या ठिकाणी राहत असलेल्या काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झा मागवला होता. त्याचवेळी ही बाब वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नारहारे यांना कळली. यानंतर त्यांनी एक अजब फतवा जारी करत पिझ्झा मागवणा-या विद्यार्थिनींना हॉस्टेलबाहेर काढले.
एका खोलीत राहणा-या चार विद्यार्थिनींपैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला? हे स्पष्ट होत नसल्याचे कारण देत चौघींनाही एका महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मीनाक्षी नरहारे यांनी काढलेल्या या अजब फतव्याने समाज कल्याण विभाग देखील हादरले आहे.