20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ

बुलडाण्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ

बुलडाणा : प्रतिनिधी
राज्यात एचएमपीव्ही व्हायरसची भीती सतावत असताना राज्यातील बुलडाणा, शेगाव येथे मात्र एका अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसांत चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून, अनेकजण व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगावच्या अनेक गावांत सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. येथे या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमवावे लागत आहेत. आधी डोक्याला खाज सुटते, नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिस-या दिवशी चक्क टक्कल पडते, यामुळेच नागरिक घाबरले आहेत. विशेष म्हणजे शेगावजवळील अनेक गावांत हा व्हायरस पसरला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेले आहेत, त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडूनही प्रशासन मात्र या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. केसगळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक हे खाजगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहेत.

कशामुळे पडतंय टक्कल?
मात्र अनेक गावांतील नागरिकांना टक्कल पडण्याची ही समस्या भेडसावत असून स्त्रियाही त्यातून वाचू शकलेल्या नाहीत. पण हा प्रकार नेमका का घडतोय हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. शाम्पू वापरल्यामुळे हा प्रकार घडून केसगळती आणि टक्कल पडत असावे असे डॉक्टरांचे मत आहे. पण ज्यांनी आयुष्यात कधीच शाम्पू वापरलेला नाही, त्याला हातही लावला नाही त्या लोकांचे केस जात असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिर राबवण्याचे आवाहन केले आहे.

सर्वेक्षणात आढळले ३० पेक्षा जास्त बाधित
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने भोन गावात सर्वेक्षण केले त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने ३० जण बाधित असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत पुढील योजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणं पाहून उपचार सुरू करण्यात आले आहेत. एकीकडे जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य मंत्री असताना नेमक्या अशा घटना पुढे आल्यानंतर उपाययोजना आणि तत्पर पावले का उचलली जात नाहीत, हा देखील एक प्रश्न आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR