सोलापूर :उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावच्या उपसरपंचावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. या संदर्भातली नोटीस त्यांनी तहसीलदारांना पाठवली आहे. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमधील सहा सदस्यांनी या नोटिशीवर सह्या केल्या आहेत. या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना गेल्याच महिन्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी आढळल्याने बडतर्फ करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेल्या बेलाटी ग्रामपंचायतीच्या कारभारात सातत्याने घडामोड होत आहे. गेल्याच महिन्यात सरपंच शिवनेरी पाटील या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना विभागीय आयुक्तांनी बडतर्फ करण्याचे आदेश दिले. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच प्रभू राठोड यांच्याकडे होता. मात्र त्यांच्यावर सहा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र पाठवले आहे.नऊ ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये सहा सदस्यांनी उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे सरपंचानंतर उपसरपंचांचे पदही जाणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.सुभाबाई राठोड, विभीषण लोंढे, रामचंद्र कोकाटे, मेघा खटकाळे, नितीन गव्हाणे, सुभाबाई घोडके.या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे