15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeसोलापूरबोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ रखडलेलेच

बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ रखडलेलेच

सोलापूर : बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मागील १४ वर्षानंतरही कागदावरच असून निर्वनीकरणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. केंद्राच्या नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाने तो प्रस्ताव फेटाळला असून त्यानंतर फेर प्रस्ताव सादर झालेला नाही. त्यामुळे आता होटगी रोड विमानतळाचीच सोलापूरकरांना आशा आहे.

बोरामणी विमानतळासाठी तत्कालीन राज्य सरकारने काही खासगी जमीन संपादनासाठी काही प्रमाणात निधी देखील दिला होता. मात्र, निर्वनीकरणाचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. बोरामणी विमानतळासंदर्भात शासन स्तरावरून अनास्था दिसून येते. सोलापूर जिल्ह्यासाठी विमानतळ असणे काळाची गरज ओळखून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले.

होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत ९२ मीटर चिमणी पाडल्यानंतर दोन ते सहा महिन्यात विमानसेवा सुरू होईल, अशी चर्चा झाली. तरीदेखील विमानसेवा नेमकी कधीपासून सुरू होईल यासंदर्भात मतमतांतरे आहेत. अजूनही धावपट्टीचे काम पूर्णपणे झालेले नाही. अंतर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची सोय, अशी कामे पूर्ण झाल्यावर त्याची पडताळणी होईल. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही होणार आहे, पण त्यासाठी नेमका किती कालावधी लागणार, बोरामणी विमानतळ सुरू होईल की नाही, यासंदर्भातील उत्तरे अजूनही स्पष्टपणे सोलापूरकरांना मिळालेली नाहीत. त्यासंदर्भात प्रशासन व लोकप्रतिनिधींना बोलावेच लागेल, अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे.

बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा निर्णय डिसेंबर २००८ रोजी झाला. जानेवारी २००९ नंतर विमानतळासाठी जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरू झाली. आतापर्यंत या विमानतळासाठी तब्बल ५७५ हेक्टर (१४३७ एकर) जमिनीचे संपादन झाले असून त्यासाठी अंदाजे १२० कोटींपर्यंत खर्च झाला आहे. खासगी जमिनीचे संपादन होत असतानाच त्या परिसरातील वन विभागाच्या जमिनीच्या संपादनाचा विषय मार्गी लागला नाही. सध्या या विमानतळासंदर्भातील पुढील सर्व कार्यवाही ठप्प असल्याची सद्य:स्थिती आहे.

सोलापूर जिल्ह्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नागपूर येथील वन विभागाच्या सचिवांकडे निर्वनीकरणासंदर्भातील फेर प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली आहे. पण, त्यावर अजूनपर्यंत होकार आलेला नाही. विमानतळाच्या जागेशेजारील माळढोक अभयारण्य व परदेशी पक्षांचा थांबा आणि जवळच पुणे, विजयपूर व कलबुर्गी विमानतळ असल्याने निर्वनीकरण होईल की नाही, यांसदर्भात अधिकाऱ्यांनीही तोंडावर बोट ठेवले आहे. दुसरीकडे खुद्द राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील विमानतळ देखील निर्वनीकरणामुळेच रखडल्याची वस्तुस्थिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR