सोलापूर: ब्राह्मण समाजाला एकत्र आणण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या जुळे सोलापूर ब्रह्म सेवा मंडळाचा पुरुषांसाठी तिळगूळ वाटप व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी निःस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या आद्यगुरूजी राघवेंद्राचार्य यांचाही ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
जुळे सोलापुरात विविध ब्राह्मण संघटनांतर्फे समाजाला एकत्र आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. जुळे सोलापूर ब्रहा सेवा मंडळातर्फेही वर्षभर सामुदायिक मुंजी, महिलांचा सत्कार, तिळगूळ वाटप असे कार्यक्रम राबविले जातात.
येथील दीपाली केटरर्समध्ये झालेल्या तिळगूळ वाटप व हळदीकुंकू कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाळकृष्ण उपाध्ये, पंचांगकर्ते मोहन दाते, राम तडवळकर, रमण कुलकर्णी, संतोष पंतोजी, राजेंद्र रिसबूड ब्रह्म सेवा मंडळाचे संचालक प्रमोद तम्मनवार, प्रशांत कुलकर्णी, उपाध्यक्षा अनिता कुलकर्णी, अमृता गोसावी यांच्यासह सुमारे दीडशे महिला व १२५ पुरुषांची उपस्थिती होती.
डी. डी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात ब्रह्म सेवा मंडळाच्या कार्याची माहिती दिली. प्रमोद तम्मनवार यांनी आभार मानले. दरम्यान, निःस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्या आद्यगुरू राघवेंद्राचार्यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात
आला. एखाद्या वैदिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा समाज अशा पद्धतीने एकत्र येऊन वाढदिवस साजरा करतो ही पहिलीच वेळ असल्याचे सांगून मान्यवरांनी राघवेद्राचार्य यांच्या कार्याचे कौतुक केले.
जुळे सोलापूर सहयोग ब्राह्मण सेवा मंडळातर्फे याच ठिकाणी तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम झाला. यामध्ये श्री. भगवान परशुराम जन्मोत्सव चषकाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल रमण कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्कार भारतीचे आनंद देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला.ब्रह्म सेवा मंडळातर्फे यंदा एक मे रोजी सामुदायिक मुंजी होणार आहेत. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. ब्राह्मण समाजातील अनेक बटूंच्या मुंजी या माध्यमातून केल्या जातात. यंदा दीपाली केटर्समध्ये सामुदायिक मुंजी होणार असून आपली नावे नोंदवावीत असे आवाहन डी. डी. कुलकर्णी यांनी केले आहे.