नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी ब्रिजभूषण सिंगला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. ब्रिज भूषण यांनी आपल्या विरोधात दाखल केलेला एफआयआर, आरोपपत्र आणि कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सध्या त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. दिल्ली हायकोर्टाने ब्रिजभूषण यांच्या वकिलाला कोर्टात या प्रकरणाबाबत एक छोटी नोट सादर करण्यास सांगितले आहे.
हायकोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या याचिकेच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात आरोप निश्चित झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिजभूषण यांना न्यायालयात येण्याचे सांगून, त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.ब्रिजभूषण यांच्या वकिलानुसार, या प्रकरणात सहा तक्रारदार आहेत. एफआयआर नोंदवण्यामागे छुपा अजेंडा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वकिलाच्या म्हणण्यानुसार, सर्व घटना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून, हे ब्रिजभूषण यांच्याविरोधात षड्यंत्र असल्यासारखे आहे, असा युक्तिवाद केला होता मात्र न्यायालयाने तो मान्य केला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बजरंग पुनिया साक्षी मलिक आणि विनेश फोगट सारख्या बड्या पैलवानांच्या नेतृत्वाखाली ३० कुस्तीपटू भारतीय कुस्ती संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषणावर बसले होते. महिला कुस्तीपटुंनी ब्रिजभूषण आणि प्रशिक्षकांवर लैंगिक शोषणाचे आरोप करत ब्रिजभूषण हे कुस्ती संघटना मनमानी पद्धतीने चालवत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.