17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeब्रिटनच्या विद्यापीठात नवीन रक्तगटाचा शोध

ब्रिटनच्या विद्यापीठात नवीन रक्तगटाचा शोध

 

लंडन : वृत्तसंस्था
ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ (एनएचएसबीटी) आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांना एक नवीन रक्तगट आढळला आहे. या रक्तगटाला त्यांनी ‘माल’ (एमएएल) असे नाव दिले आहे. या शोधामुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ‘एएनडब्लूजे’ या रक्तगट अँटिजेनभोवती निर्माण झालेले गूढही उलगडले असल्याचे संशोधकांनी सांगितले. या नव्या संशोधनामुळे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात मदत होईल, असा विश्­वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रयोगासाठी संशोधकांनी २० वर्षे व्यतीत केली आहेत. लुईस टिली यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले आहे. १९७२ मध्ये ‘एएनडब्लूजे’ या रक्तगटाचा अँटिजेन (लाल रक्तपेशींच्या बाहेर असलेले शरीरातील प्रथिने) सापडल्यानंतरही त्याच्या जनुकीय पार्श्वभूमीचा तपास लागत नव्हता. हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन चाचणी शोधून काढली. प्रत्येकाच्या शरीरात असे अँटिजेन असतात, पण कधी कधी त्यांची संख्या कमी असू शकते. ‘एनएचएसबीटी’ने जनुकीय चाचणीचा आधार घेत रुग्णांमधील हे कमी असलेले अँटिजेन शोधून काढण्याची नवी चाचणी तयार केली.

काही रुग्णांवर उपचार करताना रक्त बदलावे लागते. त्यापैकी काही जणांवर याचा विपरित परिणाम होतो. अशा लोकांचा हाच दुर्मिळ रक्तगट आहे का, हे या चाचणीच्या आधारे शोधता येणार आहे.

हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असला तरी अशा लोकांना आजार झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे. जगभरात वर्षाला किमान ४०० लोकांना तरी या नव्या चाचणीमुळे फायदा होईल, असा अंदाज लुईस टिली यांनी व्यक्त केला. चाचणीमुळे नव्या रक्तगटाचे रुग्ण आणि रक्तदाते शोधणे सोपे जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR