हिंगोली : अखंड हरिनाम सप्ताहात भगरीच्या प्रसादातून जवळपास दीडशे जणांना विषबाधा झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे २० फेब्रुवारी रोजी घडली. प्रसाद खाल्ल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ होणे सुरू झाल्याने रुग्णांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रेणापूर येथील मारुती मंदिरात मागील चार दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी जया एकादशीनिमित्त उपवास असणा-या भाविकांसाठी सायंकाळी ६ वाजता जवळपास ४० किलो भगरीचा प्रसाद ठेवण्यात आला होता. हा प्रसाद गावातील ५०० लोकांनी खाल्ला.
परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास काहींना उलट्या, मळमळ, डोकेदुखी आदी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ३५ जणांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी तातडीने उपचार सुरू केले. तर दुस-या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जवळपास आणखी ३० जणांना लक्षणे जाणवत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या सर्व जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.