मुंबई : प्रतिनिधी
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी निवडणूक आयोगावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसणारे श्वान असल्याची खळबळजनक टीका त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग आणि इतर एजन्सी पंतप्रधान मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसून असल्याचे ते म्हणालेत. भाई जगताप यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे निकाल आले, तसे निकाल येण्यासारखं कोणतंही काम राज्य किंवा केंद्र सरकारने केलेले नाही. हा सर्व ईव्हीएमचा खेळ आहे. त्यावर बोलणं गरजेचं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभे राहत असताना त्याचे उत्तर निवडणूक आयोगाला द्यावेच लागेल”, असे जगताप म्हणाले. ज्या नेत्यांवर भाजपानं आरोप केले. त्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये ते स्वच्छ झाले, असा आरोपही त्यांनी केला.
प्रवीण दरेकर यांचा पलटवार
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी भाऊ जगताप यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले,उमहाविकास आघाडीचे नेते वाचाळवीरांसारखे बडबडत आहेत. त्यामुळं तेच भुंकत असावेत, असा जोरदार पलटवार दरेकर यांनी केलाय.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात कॉंग्रेसला राज्यात १६ जागांवर विजय मिळवता आलाय. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांना सत्तेवर येण्याची आशा होती. मात्र, त्यांना एकत्रित मिळून केवळ ४६ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळं महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून या पराभवाचं खापर अप्रत्यक्षपणे ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडले जात आहे. महायुतीतील भाजपाला १३२ जागा, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला आहे.