कलबुर्गी : वृत्तसंस्था
एकीकडे तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून राजकारण तापले असताना कर्नाटकमध्ये उत्तर आणि दक्षिणेतील विद्यार्थ्यांमध्ये भाकरीवरून वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली.
कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठात भाकरीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हा वाद झाला. कर्नाटक केंद्रीय विद्यापीठ, कलबुर्गी जिल्ह्यामधील आळंद तालुक्यात कडगंची गावामध्ये आहे. तिथे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या कॅन्टिनमध्ये भाकरीवरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये दोन विद्यार्थ्यांत भाकरीवरून वादावादीला सुरुवात झाली. त्यावेळी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी मशीनवर तयार केलेल्या भाकरीची मागणी केली. तर दक्षिण भारतीय विद्यार्थ्यांना हाताने तयार केलेली भाकरी हवी होती. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद थोड्याच वेळात धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. मग बघता बघता दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भांडणात अनेक विद्यार्थी सहभागी होते. त्यात प्रशांत, सुहास आणि इतर विद्यार्थी मुख्यत्वेकरून सहभागी होते. या धक्काबुक्कीमध्ये अनिकेत नावाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलीस तिथे येताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण बनली. या घटनेनंतर विद्यापीठाच्या रजिस्ट्रारनी नरौना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.