लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे लातूर तालुकाध्यक्ष राजाभाऊ आलापुरे आणि वंचितचे पदाधिकारी राजेंद्र सरवदे, दीपक चक्रुपे यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्ष आणि ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. गटतट न पाहता सर्वाना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम धिरज देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या निवडणुकीत विरोधी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसून येत आहेत. बुधवारी भाजपच्या किसान मोर्चाचे लातूर तालुकाध्यक्ष राजाभाऊ आलापुरे, वंचितचे पदाधिकारी राजेंद्र सरवदे व दीपक चक्रुपे यांनी देखील लातूर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश करत धिरज देशमुख यांचे हात बळकट केले आहेत. यावेळी रवींद्र काळे, धनंजय वैद्य, नरेश पवार, नानासाहेब रोंगे, विकास देशमुख, राहुल डोंगरे, भोईसमुद्राचे उपसरपंच बळीराम साळुंके, मच्छिंद्र कांबळे, अमोल पाटील, मुनीर शेख, गजानन उपाडे आदी उपस्थित होते .
या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करत आमदार धिरज देशमुख यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपला धक्का बसला असून काँग्रेसची ताकद वाढली आहे, ज्यामुळे काँग्रेस उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांना निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.