मुंबई : आमचे लोक ट्रेनच्या चेंगराचेंगरीमध्ये मरत आहेत, मात्र या देशाच्या रेल्वेमंत्र्यांना त्याचे काहीच वाटत नाही. देशाचे रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या स्वप्नात आहेत. तसेच या सरकारच्या काळात आतापर्यंत देशात २५ पेक्षा जास्त मोठे रेल्वे अपघात झाले आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
आजच्या वांद्रे येथे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी ते माध्यमांशी संवाद साधत होते. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात आणि राज्यात २५ पेक्षा अधिक मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. मात्र या सरकारला त्याचे काहीच पडले नाही. आमची जनता येथे चेंगराचेंगरीमध्ये मरत आहे,
पण रेल्वे सेवेच्या सुधारणेबाबत कोणालाही चर्चा करायची नाही आहे, अशी टीका संजय राऊतांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली आहे. तसेच मंत्री नितीन गडकरी हवेत बस चालवण्याची गोष्ट करतात, पण रस्त्यावर सध्या काय घडत आहे त्याचे कोणालाच काही पडले नाही. सध्या प्रवाशांचे जे हाल झाले आहेत, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील यावेळी राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच या लोकांकडून मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.