मंत्रिमंडळ विस्तारात फेरबदलाचे संकेत, ११ ला विस्तार
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिल्यानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून, महायुतीतील तिन्ही पक्षांच्या मिळून ३२ जणांचा शपथविधी होऊ शकेल. भाजपा व शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना विश्रांती देऊन नवीन चेह-यांना संधी दिली जाणार अशी चर्चा आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही भाकरी फिरवण्याची शक्यता असून, दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतरही आधी मुख्यमंत्रीपदासाठी व नंतर महत्वाच्या खात्यांसाठी झालेल्या रस्सीखेचीमुळे सरकार सत्तेवर यायला बराच वेळ लागला. अखेर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ््यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचाच शपथविधी झाला. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले.
नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी शनिवारपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन होत आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड व राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. त्यानंतर ११ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. महायुतीतील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे व कोणती खाती मिळणार, हे अजून गुलदस्त्यात आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र याबाबतची सगळी चर्चा झाली असून, काही किरकोळ बाबी शिल्लक असल्याचा दावा केला. कायद्याप्रमाणे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्के मंत्री असू शकतात. म्हणजेच महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचे मंत्रिमंडळ होऊ शकते. तिघांचा शपथविधी झाला असून उरलेल्या ४० जागांपैकी ३२ जागा भरून ८ जागा तूर्त रिक्त ठेवण्याचा निर्णय होऊ शकेल. त्यामुळे संधी न मिळालेल्या लोकांसाठी एक आशेचा किरण शिल्लक राहणार आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार ६ आमदारांमध्ये एक मंत्रिपद असे सूत्र ठेवण्याचा भाजपाचा प्रस्ताव आहे. तसे झाल्यास भाजपाला २२, शिंदेंच्या शिवसेनेला १० व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ७ मंत्रिपदे मिळतील. परंतु शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठीचा आग्रह सोडताना किमान १४ मंत्रिपदाची तर राष्ट्रवादीने १० मंत्रिपदाची मागणी केली आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार शिंदेंना १२ तर राष्ट्रवादीला ९ मंत्रिपदे दिली जाऊ शकतील.
यात विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या १५, शिंदेंच्या ९ व राष्ट्रवादीच्या ८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजपाने मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये नेतृत्वबदल करून दिग्गजांना धक्का दिला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व कायम ठेवले असले तरी मंत्रिमंडळात मोठे बदल करून काही दिग्गजांना धक्का दिला जाईल, अशी शक्यता आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, विजयकुमार गावित हे डेंजर झोनमध्ये आहेत. शिंदे यांच्या मंत्र्यांपैकी दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांचा पुन्हा नंबर लागणार नाही, असे सांगितले जाते आहे. राष्ट्रवादीतील दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह संजय बनसोडे यांच्या समावेशाबाबत शंका व्यक्त होत आहे.
पंकजा मुंडे, संजय कुटे,
गोगावले, शिरसाटांची वर्णी?
भाजपकडून यावेळी पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. याशिवाय संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, परिणय फुके, नितेश राणे या नवीन चेह-यांना संधी मिळू शकेल. विद्यमान मंत्र्यांपैकी गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, यांचा समावेश होऊ शकेल. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचीही नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम यांच्यासोबत काही नवीन चेहरे येऊ शकतील.