नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय वादामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर काही मंत्र्यांची विधाने हास्यास्पद आणि च्ािंताजनक असल्याची तक्रार करण्यात आली आहे. राज्य सरकारने प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवे होते, अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आहे.
घटना कुणामुळे घडली, जबाबदारी कुणाची यावर भाष्य करण्यापेक्षा जनतेमधील असंतोष वाढू न देणे गरजेचे आहे. शिवरायांच्या पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती, असे मत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे आहे. तसेच ‘विरोधकांकडून या घटनेचा राजकीय मुद्दा बनवला जात असेल तर गांभीर्याने विचार करावा’, असा सल्ला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्य सरकारला दिला. संवेदनशील प्रकरण काळजीपूर्वक आणि सबुरीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा घटना आणि विधानांमुळे कल्याणकारी योजनांच्या प्रचारामध्ये अडथळा ठरु शकतो, असे मत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे आहे.
बदलापूरमधील प्रकरण राज्य सरकारला जड गेलं. आता मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे प्रकरण घडले आहे. राज्य सरकार काही कल्याणकारी योजना घेऊन जनतेसमोर जात होतं. पण त्या सर्व योजनांना एकप्रकारे खो बसतोय, सरकारचं काम कमी पडतंय, अशी नाराजी केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.