बीड : प्रतिनिधी
नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा विष पिऊन स्वत:चा जीव संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष प्यायले होते. फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे भरत जाधव यांनी एक व्हिडिओमध्ये म्हटले आहे. पोलिसांसमोर विष घेण्यापूर्वी त्यांनी कारमध्ये बसून एक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी ते म्हणाले, प्रचंड मानसिक तणावातून हे पाऊल उचलत आहे. समाजात वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. २५ वर्षांच्या राजकारणात मी कधीच अप्रामाणिकपणा केला नाही. मात्र आता मला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या ४ ते ५ वर्षांपासून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अनेक प्रकल्प केवळ राजकीय दबाव वापरून थांबवण्यात आल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी जामखेड तालुक्यात इमारतीचे काम सुरू केले होते. यावेळी त्यांच्यासोबत रमेश आसबे, युनूस सैय्यद, बेबीचंद धनावडे होते. मात्र राजकीय दहशतीतून इथलं काम बंद पाडण्यात आल्याचं भरत जाधव यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं.