28.5 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeराष्ट्रीयभाजपसोबत गेलो ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक

भाजपसोबत गेलो ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक

माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला

चंदिगड : सध्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. अशातच माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान चौटाला म्हणाले, शेतक-यांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू होते. त्यावेळी भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. ती चूक आज स्वीकारत आहे, अशी ग्वाही दुष्यंत चौटाला यांनी दिली.

चौटाला पुढे म्हणाले की, आम्ही भाजपसोबत सरकार चालवले, विकासकामे केली. मात्र, निवडणुकीत काही गोष्टींवर सहमती झाली नाही, तेव्हा भाजप आणि आमचे रस्ते वेगळे झाले. हरियाणातील जनता या निवडणुकीत आम्हाला साथ देईल, अशी अपेक्षाही चौटाला यांनी यावेळी व्यक्त केली. दुष्यंत चौटाला हे शेतकरी आंदोलनावेळी भाजपसोबत सत्तेमध्ये होते.

यावेळी त्यांनी भाजपने आपल्याला पुढे केल्याची खंत देखील व्यक्त केली. ते म्हणाले की, शेतकरी आंदोलनात सर्वांत मोठा खलनायक मला ठरवण्यात आले. आमच्या पक्षातील एकही लोकसभा सदस्य आवाज उठवण्यासाठी नव्हता. आज नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहेत. पण, तेव्हा भाजपसोबत सरकार स्थापन केले नसते, तर हरियाणाच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसती, असेही दुष्यंत चौटाला म्हणाले.

३७८ दिवस केले होते शेतक-यांनी आंदोलन
दरम्यान, २०२१ साली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. शेतक-यांनी याला तीव्र विरोध करत तब्बल ३७८ दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनात सातशेच्या वर शेतक-यांचा मृत्यू झाला होता. याचा परिणाम आता हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील दिसून येत आहे. ‘४०० पार’चा नारा देणा-या भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगलाच दणका बसला होता. आता शेतक-यांच्या आंदोलनावेळी घेतलेल्या भूमिकेमुळे हरियाणात भाजपचे पानिपत होण्याची शक्यता आहे. तर हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी भाजपसोबत जाऊन चूक केली अशी भावना व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR