मुंबई : प्रतिनिधी
राज्यात निवडणुकांच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढत आहेत आणि ही महागाई शेतक-यांसाठी लाभदायक ठरू शकते. दिवाळीनिमित्त कमी झालेले फळांचे आणि पालेभाज्यांचे दर आता वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. नवीन कांद्यांचे दर वाढले असून जुन्या कांद्याच्या विक्रीत वाढ झाल्याने कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे.
मागच्या आठवड्यात बाजार समितीमध्ये कांद्याचा दर १८ ते ४८ रुपये किलो दरम्यान होता. आता तोच कांद्याचा दर ३५-६२ रुपये किलोवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात कांदा ७५-८० रुपये दराने विकला जात आहे. तसेच लसूण बाजारात ३५०-४०० रुपये दराने विकला जात आहे. त्याचप्रमाणे मेथीची जुडी बाजारात ३० रुपये किलो दराने विकली जात असून या वाढत्या मागणीमुळे शेतक-यांना अधिक नफा मिळू शकतो. हिवाळ्यात लोकप्रिय असलेल्या भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगांचा दर बाजारात १३० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
या भाववाढीचा थेट लाभ शेतक-यांना मिळू शकतो, यासाठी त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. दरम्यान, दिवाळीच्या सुटीनिमित्त अनेक लोक गावी जातात त्यामुळे शहरातील गर्दी कमी होते. याच कारणामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांची विक्री होत नाही त्यामुळे शेतक-यांना मिळणारा दर कमी होतो. दिवाळीची सुटी संपल्यावर सगळे पुन्हा शहरात येतात आणि या वाढत्या गर्दीमुळे पुन्हा भाज्यांचे दर वाढले आहेत. दिवाळीमध्ये असलेल्या दरापेक्षा आता १०-२० रुपये किलोने दर वाढले असल्याचे शेतक-यांनी सांगितले आहे.
सफरचंदाचे दर आटोक्यात
सध्या बाजारात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक होत असते. दरम्यान, फळबाजारामध्ये पेरूचे दर वाढले आहेत मात्र, देशी सफरचंदाचे दर आटोक्यात आहेत. धान्यबाजारामध्ये डाळीच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तसेच आता सर्व सणांनंतर आता फुलांच्याही दरात घसरण झाली आहे. मात्र, आता लग्नसराईचा थाट सुरू झाल्यानंतर फूलबाजाराला तेजी येणार आहे. सध्या झेंडू, शेवंती आणि अष्टर या फुलांची किंमत १००-१२० रुपये किलो आहे, तर गुलाब २५०-३०० रुपये किलो आहे.