32.5 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारत-पाक तणावामुळे जगभरातील राष्ट्रप्रमुख चिंतेत!

भारत-पाक तणावामुळे जगभरातील राष्ट्रप्रमुख चिंतेत!

जग चिंताक्रांत । संयम, शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्यावर चीनचा भर; जी-७ राष्ट्रांचा सन्मान्य तोडग्यास समर्थन; अमेरिकेने भूमिका बदलली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या अनुषंगाने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. चीन असो अमेरिका असो किंवा युरोपीय देश किंवा आखाती देश असोत; जगभरात बहुतांश देशांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाची चर्चा आहे. जगभरातील बलाढ्य नेते हा तणाव कमी करण्याचे आवाहन दोन्ही देशांना करत आहेत.
चीन : चीन भारत-पाकिस्तान तणावावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अलीकडच्याच एका टिप्पणीत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दोन्ही देशांच्या तणावावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले, आम्ही दोन्ही बाजूंना शांतता आणि स्थैर्यासाठी सहकार्य करण्याचे तसेच शांतता आणि संयम बाळगण्याचे, शांततापूर्ण मार्गाने राजकीय तोडगा काढण्याच्या मार्गावर परतण्याचे आवाहन करतो. तणाव आणखी वाढू शकेल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहनही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांच्याही मूलभूत हितासाठी स्थिर आणि शांततापूर्ण प्रदेशासाठी हे आवश्यक असल्याचा चीनने म्हटले आहे.
जी-७ राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर अमेरिका आणि युरोपीय देशांच्या जी-७ राष्ट्रांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि युरोपियन युनियन सदस्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आणि उच्च प्रतिनिधींनी दोन्ही देशांना तणाव तातडीने कमी करण्याचा आवाहन केले आहे.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या लष्करी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रादेशिक स्थिरतेला गंभीर धोका झाल्याचे जी-७ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी निवेदनात म्हटले. आम्हाला दोन्ही बाजूंच्या नागरिकांच्या सुरक्षेची खूप काळजी आहे. आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जलद आणि कायमस्वरूपी राजनैतिक तोडग्यासाठी आमचा पाठिंबा असेल असेही या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिका : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांनी भारत-पाकला चर्चेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच पाकच्या लष्करप्रमुखांना आज अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फोन केला. यावेळी ठोस चर्चा करुन संभाव्य धोका टाळण्याचं आवाहन परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया यांनी केलं. रशिया, जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. तर चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिली आहे. अमेरिका देखील भारताच्या बाजूने असल्याचं जाहीर केलं. तसेच भारत आणि पाकिस्तानच्या तणावात आमचा काय संबंध म्हणणा-या अमेरिकेने २४ तासांत भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे.
सौदी अरेबिया : आखाती प्रदेशातील आघाडीचा देश मानल्या जाणा-या सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक संक्षिप्त निवेदन जारी करून दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. या निवेदनात म्हटले की, सौदी अरेबियाच्या नेतृत्वाच्या विनंतीवरून परराष्ट्रमंत्री अब्देल जुबैर यांनी ८ आणि ९ मे रोजी भारत आणि पाकिस्तानचा दौरा केला. ही भेट दोन्ही बाजूंमधील तणाव कमी करण्यासाठी आणि संवादाद्वारे वाद सोडवण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सौदी अरेबियाच्या प्रयत्नांचा एक भाग होती.
इजिप्त : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आणखी तणाव वाढवू नये असे आवाहन इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनातून करण्यात आले. इजिप्तने भारत आणि पाकिस्तानला जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक मार्गांनी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
तुर्कस्तान : तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर) वरून एक पोस्ट करत पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे उद्भवणा-या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली. एर्दोगान यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेल्या आपल्या बांधवांवर दया करण्यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना करतो आणि मी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बंधूभावाच्या लोकांना आणि पाकिस्तानला माझ्या संवेदना व्यक्त करतो. तुर्कीचे अध्यक्ष त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील भयानक दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव आम्हाला योग्य वाटतो. काही लोक आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुर्की तणाव कमी करण्याच्या आणि संवादासाठी मार्ग उघडण्याच्या बाजूने आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR