लातूर : प्रतिनिधी
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतातील वय वर्ष १५ व त्यापुढील सर्व नागरिकांना २०३० पर्यंत साक्षर करण्याचे उद्दिष्ट असून यामध्ये त्यांना त्यांची वैयक्तिक कौशल्याबरोबरच त्यांचे जीवन ही विकसित करण्यात येणार आहे असे प्रतिपादन शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी लातूर येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये केले.
केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा संपूर्ण देशासह राज्यभरामध्ये राबविण्यात येत असून यामध्ये वय वर्ष १५ व त्यापुढील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या या योजनेचा आढावा प्रसंगी डॉ. पालकर बोलत होते. या बैठकीस विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, डाएट प्राचार्य डॉ. भागिरथी गिरी, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, वंदना फुटाणे, नागेश मापारी, सराफ, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, सचिन मुंडे, दत्तात्रय थेटे, सिद्धेश्वर आलमले, राजकुमार देवकर, रवि कुलकर्णी, सुनीलकुमार सातपुते, मकरंद कुदळे उपस्थित होते.
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२ ते २७ या कालावधीचा हा कार्यक्रम असल्याचे सांगताना शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा प्रत्येक मानवाला मिळालेला महत्वपूर्ण अधिकार असून शिक्षणाच्या माध्यमातून विविध कौशल्ये विकसित करत त्यातून मानवाचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगून डॉ. पालकर म्हणाले की, युनो व केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात आहे. जागतिक स्तराचा विचार केला असता भारताचे असाक्षरतेचे प्रमाण हे त्या मानाने बरेचसे अधिक आहे आणि ही बाब युनोच्या लक्षात आल्यानंतरच भारताला २०३० पर्यंत साक्षर करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य सुरू आहे. राज्याच्या तुलनेत आपले काम कमी जरी असेल तरी मागच्या आठवड्यापासून लातूर जिल्ह्याने गती घेतली असून हा वेग कायम ठेवावा व इतर सर्व योजनांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी विभागातील सदर योजनेची स्थिती सांगताना उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी उपस्थितांचे आभार
मानले.