रतलाम : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात राहणा-या एका १८ वर्षीय तरूणाच्या चेह-यावर इतके केस आहेत की, त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
ललित पाटीदार असं या तरूणाचं नाव असून तो हायपरट्रिकोसिस नावाच्या एका दुर्मीळ आजारानं पीडित आहे. या आजाराला वेअरवोल्फ सिंड्रोम असंही म्हटलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे या दुर्मीळ आजारानं जगभरात सध्या केवळ ५० लोक पीडित आहेत. या रूग्णांच्या चेह-यावर सामान्य लोकांच्या तुलनेत खूप जास्त केस येतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ललितचा ९५ टक्के चेहरा केसांमुळे झाकला गेला आहे. केसांमुळे त्याच्या चेह-यावरील डोळे, नाक, कान, ओठ काहीच दिसत नाही.
ललितनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला सांगितलं की, जे लोक मला पहिल्यांदा बघतात, ते माझा चेहरा बघून घाबरतात. पण जेव्हा लोक माझ्याशी बोलतात आणि माझ्याबद्दल जाणून घेतात तेव्हा त्यांना मी सुद्धा त्यांच्यासारखा सामान्य असल्याचं समजतं. माझा स्वभाव सामान्य लोकांसारखाच आहे.
ललित लोकांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही. त्याला हे माहीत आहे की, त्याचा चेहरा सामान्य नसला तरी ही त्याची एक वेगळी ओळख आहे. जी स्वीकारली पाहिजे. ललित एक यूट्यूब चॅनल चालवतो. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याआधी ललित इटलीच्या मिलान शहरात एका टीव्ही शोमध्ये दिसला होता. इथे रेकॉर्ड बनवण्याआधी त्यांच्या केसांचे मोजमाप घेण्यात आले होते.