नागपूर : वृत्तसंस्था
राज्यपालांच्या अभिभाषणावरिल चर्चेवेळी विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट राज्यपालांनाच लक्ष्य करत काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या बोलण्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला.
भास्कर जाधव यांनी राज्यपालांवर हेत्वारोप केले आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे कामकाजातून काढून टाकावे असे भातखळकर म्हणाले. त्याच वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप करत विरोधक पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत असे म्हटले. त्यानंतर जाधव आणि विखे यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले. शेवटी तालिका अध्यक्षांना यात हस्तक्षेप केला.
भास्कर जाधव यांनी भाषणाच्या सुरूवातीपासून आपला रोख राज्यपालांवर ठेवला होता. राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यपाल हे जवळपास ६० वेळा माझं सरकार, माझं सरकार असं बोलले. पण हे तुमचं सरकार कसं झालं असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. नव्या सरकार स्थापनेवेळी राज्यपालांनी स्वत:हून मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी का निमंत्रित केलं नाही असा प्रश्नही त्यांनी केला. शिवाय शपथविधीची अधिसुचनाही काढली गेली नव्हती, असं ते म्हणाले. त्यामुळे राज्यपालांना गृहीत धरलं गेलं होतं का? अशी विचारणाही त्यांनी केली.
दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तालिका अध्यक्षांच्या मदतीला धावून आले. भास्कर जाधव हे जेष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याकडून अशा पद्धतीची भाषा वापरणे योग्य नाही. त्यांचा जो काही पराभव झाला आहे, त्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. यावर अध्यक्षांनीही आपण त्यांचे वक्तव्य तपासून योग्य तो निर्णय घेवू असे सांगितले. पण अध्यक्षांनी एकदा निर्णय दिला तर त्यावर चर्चा होत नाही. त्यामुळे त्यांचे वक्तव्य काढून टाकण्यात यावे असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.