जालना/अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. याबाबत छगन भुजबळ यांनी ‘मी नाराज आहे’ असे म्हणत आपली नाराजी उघड बोलून दाखवली आहे. आता भुजबळ समर्थक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात भुजबळ समर्थकांनी निदर्शने केली. यावेळी अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवला. अहिल्यानगर शहरात माळीवाडा परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर ओबीसी समाजाच्या वतीने महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. छगन भुजबळ यांचा महायुतीने वापर केला असल्याची टीका देखील यावेळी व्यक्त करण्यात आली.
भुजबळ समर्थकांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओबीसींचा आवाज छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांना डावलत आहात. तुम्ही ओबीसींचा आवाज दाबत आहात. ओबीसी समाज एवढा दुधखुळा आहे का? आगामी निवडणुकांमध्ये दाखवून देऊ. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ, असा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे.