टोकियो : वृत्तसंस्था
गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने भरपूर प्रगती केली आहे. मात्र भूकंप, त्सुनामी, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आजही भूकंप झाल्यास हजारो लोक मृत्युमुखी पडतात. मात्र आता मानवाने त्यावरही तोडगा काढला असून, भूकंपाचा सामना करण्यासाठी खास असे घर विकसित केले आहे.
ही घरे भूकंप होताच चक्क हवेत उडतील, त्यामुळे त्या घरात वास्तव्य करणा-या माणसांचे प्राण वाचवणे सहजशक्य होणार आहे. भूकंपाचा सामना करण्यासाठीचे हे नवे तंत्र जपानमध्ये विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना भूकंपाच्या वेळी संरक्षण मिळेल, तसेच घरही कोसळण्यापासून वाचेल. जपानी कंपनी ‘एअर डॅन्शिन’ने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे भूकंप आल्यावर घर आपोआप हवेत वर जाईल. म्हणजेच भूकंप आल्यानंतर घर जमिनीपासून काही सेंटीमीटर वरच्या दिशेने जाईल. त्यामुळे भूकंपातही घरातील मालमत्तेचे फारसं नुकसान होणार नाही.
या तंत्रज्ञानानुसार बांधलेले घर एरवी जमिनीवरच राहील. मात्र भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यावर जमिनीमध्ये कंपन होऊ लागले की, हे तंत्रज्ञान सक्रिय होईल आणि घर जमिनीपासून ठराविक उंचीवर जाईल. एअर डॅन्शिन सिस्टिम आयएनसीने दिलेल्या माहितीनुसार या तंत्रज्ञानामुळे भूकंपादरम्यान, घर जमिनीपासून सुमारे ३ सेंटीमीटर उंचीवर जाईल. भूकंप आल्यानंतर केवळ ५ सेकंदात ही क्रिया घडेल. तसेच जेव्हा भूकंप थांबेल तेव्हा घर आपोआप जमिनीवर येऊन स्थिरस्थावर होईल.
भूकंपामुळे जमिनीवर कंपन होऊ लागल्यावर या तंत्रज्ञानामुळे सिस्टिम एअरबॅगमध्ये प्रचंड वेगाने हवा भरली जाईल. त्यानंतर एअरबॅग पूर्ण भरून घर जमिनीपासून काही सेंटीमीटर वर उचलेल. २०२१ मध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी ती यशस्वी ठरली होती.