फडणवीस, पवार दिल्लीत, शिंदे मुंबईतच, आज महायुतीची बैठक
मुंबईतील बैठकीत खाती,
पालकमंत्रीपदावर निर्णय?
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला एक आठवडा होत आला तरी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे घोडे अजूनही अडलेलेच आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने क्लीन कॅबिनेटची संकल्पना राबवण्याच्या सूचना देताना निष्क्रिय व वादग्रस्त मंत्र्यांना वगळून नव्या चेह-यांना संधी देण्याचे आदेश दिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असल्याची चर्चा आहे. यामुळेच संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिल्ली गाठली आहे. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच असून, त्यांनी संभाव्य मंत्र्यांची नावे व अपेक्षित खात्याची यादी मुख्यमंत्र्यांकडे दिली असल्याचे समजते. १४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून, गुरुवारी मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक होऊन खाती व पालकमंत्री पदावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी बरीच रस्सीखेच झाल्याने प्रचंड बहुमत असतानाही नवे सरकार सत्तेवर येण्यासाठी १२ दिवस लागले. अखेर ५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. तेव्हापासून मंत्रिमंडळाची विस्ताराची चर्चा सुरू आहे. १६ तारखेला विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला १५ तारखेला मुख्यमंत्र्यांचे चहापान असेल. त्यामुळे १५ तारखेपासून सरकार नागपुरात असणार आहे. त्यापूर्वी विस्तार करावाच लागेल. भाजपाच्या मंत्र्यांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनेही वादग्रस्त लोकांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असा भाजपाचा आग्रह आहे. मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्याने एकनाथ शिंदे यांच्यात असलेली नाराजी अजूनही दूर झालेली नाही. शिंदे यांनी १५ मंत्रिपदे व चांगल्या खत्यांसाठी आग्रह धरला आहे.
परवा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दिल्लीला गेले असून, तेथे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. रात्री उशिरा त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट होणार होती. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या रचनेवर शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, अजित पवार हेही रात्री दिल्लीला रवाना झाले होते. तेही अमित शाह यांना भेटणार असल्याचे समजते.
भाजपाचा क्लिन
कॅबिनेटसाठी आग्रह !
विधानसभा निवडणुकीत लोकांनी प्रचंड बहुमत दिले असल्याने तरुण व नव्या चेह-यांना सरकारमध्ये स्थान द्यावे, मंत्रिमंडळात समावेश होणारे चेहरे हे निष्कलंक असावेत, असा भाजपा नेतृत्वाचा आग्रह आहे. त्यामुळेच विस्ताराला उशीर लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेच्या काही मंत्र्यांना वगळण्यासाठी भाजपाचा दबाव आहे. स्वत: शिंदे हेही काही फेरबदल करणार असले तरी भाजपाच्या दबावामुळे संजय राठोड यांना बदलण्यास त्यांनी नकार दिला. राष्ट्रवादीतील अनेकांवर गंभीर आरोप, त्यांच्या चौकशा सुरू असताना त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असेल तर आपणही आपल्या मंत्रीपदाबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस व अजित पवार दिल्लीतून परतल्यानंतर उद्या मुंबईत तिन्ही नेत्यांची बैठक होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.