बीड : प्रतिनिधी
भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश आणि त्रासदायक कॉल पाठवण्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे (वय २५) असे आरोपीचे नाव असून अश्लील फोन कॉल करणे आणि अनुचित संदेश पाठवणे या आरोपाखाली सायबर पोलिसांनी काळे याला अटक केली.
अमोल काळे हा पुण्यात रहात असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८आणि ७९ तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली आहे.
नोडल सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निखिल भामरे (२६) यांनी तक्रार दाखल केली होती. भामरे हे मुंबईतील नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करतात. आरोपी अमोल काळे हा गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता.
अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ७८ आणि ७९ अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह एफआयआर नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि फोन करणा-याचे ठिकाण शोधले आणि तो पुण्यातील भोसरी येथे असल्याचे आढळून आले. यानंतर, सायबर पोलिसांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या अधिका-यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला अटक केली. चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली.