धाराशिव : प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-याचा आकार वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभा-यासह शिखराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तुळजाभवानीच्या मुख्य मंदिराची नव्याने बांधणी होणार आहे. दोन वर्षे देवीची मूर्ती दुस-या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. शिवाय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची नव्याने उभारणी केली जाणार आहे.
परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानीच्या मंदिराची पाहणी केली. या पाहणीनंतर तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभा-यासह शिखराची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंदिराचे नाव संरक्षित पुरातन वास्तूत असल्याने हे काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
याबाबत तुळजापूरचे आमदार तुळजाभवानी मंदिराचे ट्रस्टी राणा जगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली. त्यानुसार ‘‘गाभा-याची जागा तेवढीच राहील. या मंदिराच्या बांधकामाला दोन वर्षे देखील लागू शकतात, त्यामुळे तोपर्यंत या मंदिरातील आई भवानी मातेची मूर्ती दोन वर्षे इतरत्र हलविण्यात येणार आहे’, असे राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
याशिवाय, भाविकांना देवीच्या दर्शनासाठी कोणती व्यवस्था करता येईल, धार्मिक विधी कशा प्रकारे पार पडतील, तसेच दर्शनासाठी भक्तांना कमीत कमी त्रास होईल याची सोय कशी करता येईल, याबाबतचा अहवाल तयार करून जनतेसमोर ठेवण्यात येईल’’, अशी माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. या दृष्टीने मंदिराच्या शिखराच्या दुरुस्तीचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिरातील टाईल्स काढताना शिखराचा भार पेलणा-या चार बीमपैकी दोन बीम जीर्ण झाल्याचे आढळले. यामुळे मंदिराच्या गर्भगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. ज्यामध्ये संपूर्ण शिखर काढण्याची आवश्यकता असल्याचे जाणवले.