23.6 C
Latur
Tuesday, December 3, 2024
Homeधाराशिवमतदारसंघातील सावंतांचा बुरूज ढासळला

मतदारसंघातील सावंतांचा बुरूज ढासळला

विरोधी वातावरणामुळे मतदारसंघातच पायकुटी बांधली

मच्छिंद्र कदम
धाराशिव : जिल्ह्यातील पक्षातील इतर सर्व उमेदवारांना विजयी करण्याची हमी घेणारे माजी मंत्री तानाजी सावंत यांचाच भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघ हा बुरूज ढासळला आहे. त्यामुळे ते आपल्या स्वत:च्या मतदारसंघात अडकून पडले आहेत. राज्याचे नेतृत्व केलेले सावंत आता जिल्ह्यात आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करताना दिसून येत नाहीत. कारण त्यांच्याच मतदारसंघात मतदारांचे त्यांच्या विरोधी वातावरण निर्माण झाल्यामुळे एक प्रकारे त्यांना आपल्या मतदारसंघात पाय रोवून बसावे लागत आहे. आपल्याच मतदारसंघात पायकुटी घातल्यासारखे झाले असून याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील त्यांचेच इतर कार्यकर्ते साहेब आपल्याकडे लक्ष देत नसल्यामुळे त्यांच्याबाबत प्रचंड नाराज आहेत.

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी पक्षाला खुश करण्यासाठी वरिष्ठ नेते मंडळी यांच्याकडे मोठमोठी आश्वासने दिल्याचे दिसून आले. आपण इतक्या आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ त्यासाठी लागेल तो खर्च देऊ अशी आश्वासने त्यांनी अनेकांना दिली. प्रत्यक्षात मात्र आता जिल्ह्याबाहेरील तर सोडाच परंतु धाराशिव जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाचे इतर दोन उमेदवार आहेत, मात्र या मतदारसंघात ते त्यांच्या प्रचारासाठी फिरकले नाहीत बाकीचे तर दूरच राहिले त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे अनेकजण त्यांच्याबद्दल रोष व्यक्त करताना दिसून येत आहेत.

सावंत हे ज्या भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत त्या मतदारसंघात आज त्यांच्या पक्षाचा बरूज अक्षरश: ढासळला आहे. वाशी शहरातील मागील निवडणुकीत त्यांच्यासोबत असलेले प्रशांत चेडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत दाखल झाले आहेत. यामुळे या ठिकाणी त्यांना मागील निवडणुकीत ज्याप्रमाणे मताधिक्य मिळाले ते यावेळी मिळणे कठीण आहे याशिवाय परंडा तालुक्यात मागील निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील हे त्यांच्यासोबत होते त्यामुळे या तालुक्यातील सावंत यांना मताधिक्य मिळाले होते.

यावेळी मात्र त्या ठिकाणीही ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील त्यांच्या विरोधात आहेत. तर भूम तालुक्यात स्वत: उमेदवार असलेले राहुल मोटे यांचे वर्चस्व आहे. भूम शहरात सावंत यांच्यासोबत संजय गाढवे हे आहेत. त्यामुळे गाढवे यांच्यावर सावंत यांची मदार आहे. त्यामुळे कदाचित शहरात सावंत यांना फायदा होऊ शकेल. भूम तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर राहुल घुले, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रनबागुल हे उमेदवार रिंगणात आहेत.

भूम शहर व तालुक्यातील मतांची मोठी विभागणी होणार आहे. त्यामुळे सावंतांना या ठिकाणीही मताधिक्य मिळेल याची शाश्वती नाही. मतदारसंघात सावंत यांच्या विरोधात आज सर्वत्र वातावरणनिर्मिती झाली आहे. आपल्याच मतदारसंघात स्वत:चा विजय मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ते चांगलेच अडकून पडले आहेत. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यासोबत त्यांनी शेअर केलेल्या मोठमोठ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवताना अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात इतर ठिकाणी त्यांना फिरणे मुश्किल झाले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या त्यांच्याच कार्यकर्त्यांचा रोष त्यांच्यावर असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR